यवत: लोकसभा निवडणुकीत जाती-पाती, नात्या-गोत्यांचा विचार न करता, कोणत्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता विकासाला मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौफुला येथे केले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टी दौंड तालुका यांच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन चौफुला येथे करण्यात आले होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, कोणीही राजकारणात कायमचा विरोधक किंवा मित्र नसतो. शिवसेना व काँग्रेस एकत्र येतील, अशी कल्पना देखील कोणीही केले नव्हती. परंतु, हे पक्ष एकत्र आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेले विकास कामे, कट्टर भूमिका, जागतिक पातळीवर देश अग्रभागी नेण्यासाठी घेतलेले परिश्रम, ३७० कलम हटवणे, पाचशे वर्षात कोणालाही न करता आलेले राम मंदिर, विकास पुरुष म्हणून जगात मिळवलेली प्रतिष्ठा यामुळे नरेंद्र मोदी यांच्या बरोबर काम करावे, अशी आम्ही भूमिका घेतली. इतर राष्ट्रांनी वाकड्या नजरेने भारताकडे पाहू नये, देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या नेत्याची गरज आहे. दहा वर्षांत एकही दिवस सुट्टी न घेता सतत काम करणारे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. मी जर एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण करतोच. केंद्राचा निधी आपल्या लोकसभा मतदारसंघात आणायचा असून दौंडचा देखील विकास बारामती प्रमाणे करायचा आहे. दौंड तालुक्याला हवा तेवढा निधी दिला जाईल. परंतु, दिलेला निधी सत्कारणी लावावा व निधीतून दर्जेदार काम करणे गरजेचे आहे. या निवडणुकीत कोणीही क्रेडिटचा विचार न करता देशाच्या विकासाचा विचार करावा.
गेल्या दहा वर्षांत पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार असल्याने मेट्रो, रस्ते, शहराचा विकास झपाट्याने झाला. परंतु, बारामती लोकसभा मतदारसंघात हवा तेवढा विकास झालेला नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सुनेत्रा पवार यांच्या घड्याळ या चिन्हासमोरचे बटन दाबून विजयी करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, सरचिटणीस राहुल शेवाळे, कांचन कुल, मंगलदास बांदल, प्रेमसुख कटारिया, नंदू पवार , वसंत साळुंके, बाळासाहेब लाटकर, शब्बीर सय्यद, माऊली ताकवणे, नामदेव बारवकर, भाजपा तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांसह दौंड तालुका भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या