Ajit Pawar | बारामती : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर जाण्याची बातमी ताजी असतानाच दुसरी एक माहिती समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.शिंदे हे नाराज असल्याने सुट्टीवर गेल्याची चर्चा रंगली आहे. असे असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारमध्ये सामिल होणार असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यावरुन पुन्हा चर्चा रंगली असताना राष्ट्रवादीच राहणार असल्याचा पुनरुच्चार अजित पवारांनी केला आहे.
अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.पवार म्हणाले, ” गेल्या काही दिवसात कारण नसताना वृत्तपत्र, टीव्हीवर माझ्याबाबतच्या अनेक बातम्या, अफवा, वावड्या सुरु आहेत. कारण नसताना माझ्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. परंतु कार्यकर्त्यांनी या अफवांना बळी पडू नये. मी एक घाव दोन तुकडे करणारा व्यक्ती आहे.” मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
गेली काही दिवस सारखी माझीच चर्चा चालू आहे. त्यांना अजित पवार एवढा का आवडला समजत नाही. मी नाॅट रिचेबल असलो की दिल्ली, मुंबईपासूनचे पत्रकार मागे लागतात. एकाच वेळी अनेक ठिकाणी माझे कार्यक्रम असतात. त्यामुळे कधी काही कार्यक्रमांना हजर राहता येत नाही. तिथे नाही गेलो तर अजित पवार का आले नाहीत, कार्यक्रमाला गेलो तर इथेच का आले, अशा अनेक शंका नाहक निर्माण करत आहेत. असेही त्यांनी सांगितले.
माझ्या शरीराचा अर्धा भाग इकडे आणि अर्धा तिकडे पाठवू का ?
आता मी माझ्या शरीराचा अर्धा भाग इकडे आणि अर्धा तिकडे पाठवू का ? असा सवाल त्यांनी केला. मी काही बोललो की त्याचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मी बोललो तर असेच का बोललो, बोललो नाही तर का ? असे नाहक प्रश्न निर्माण केले जात आहेत. काहींना वाटतेय मी सकाळी आठला पुन्हा जातोय की काय? पण मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे. पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल. मी त्याच्याशी सहमत असेल. लोकांचे भले करण्याचे काम मी करतोय. सकाळी लवकर कामाला सुरुवात करून रात्री उशीरापर्यंत काम करतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या बातम्यांकडे लक्ष देवू नये. कामाकडे लक्ष देत तेथे योगदान द्या, असे आवाहन पवार यांनी स्पष्ट केले.
गचुरे धरू की मारामारी करू…
विरोध आहे म्हणून आता काय मी त्याचे गचुरे धरू की मारामारी करू, म्हणजे मी विरोध केल्यासारखे दिसेल, असे पवारांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, “विरोधक म्हणून काही सभ्यता आम्ही पाळली पाहिजे. चुकीचे बोलून काय साध्य होणार आहे. पवार यांच्यावरही राजकीय जीवनात अनेकदा कमरेखालचे आरोप झाले. पण त्यांनी विकासावरच बोलणे सुरु केले. खैरनार यांच्यापासून अनेकांनी त्यांच्यावर आरोप केले. दाउदशी संबंध जोडले. पप्पू कलानीचे नाव घेतले, एनराॅनच्या बाबतीच नको तितकी बदनामी केली. शक्तीस्थळावरच हल्ला झाला.”
शेवटी लोक गोड फळे असणाऱ्या झाडालाच दगड मारतात…
शेवटी लोक गोड फळे असणाऱया झाडालाच दगड मारतात. कडू फळे असणाऱया झाडाकडे पोपटसुद्धा जात नाही. मी माझ्या हाती असलेल्या संसदीय आयुधांचा वापर करत विरोधकांना कोंडीत पकडतो. त्यामुळे मी विरोधकांबाबत साॅफ्ट भूमिका घेतो, हा आरोप मला मान्य नाही. विधीमंडळात मी विरोधी पक्षनेता म्हणून अनेक विषयांवर आवाज उठवतो. इतर राज्यात विधानसभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, खुर्च्या फेकणे, वाईट बोलणे ते अगदी मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत, या पद्धतीने विरोध मला अजिबात मान्य नसल्याचे पवार म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Ajit Pawar : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला ३५१ कोटींचा ढोबळ नफा : अजित पवार
Ajit Pawar : मृतांच्या आकड्यात तफावत, खारगाव दुर्घटनेची चौकशी व्हावी : अजित पवार