शिरूर: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मोठा डाव टाकत एकेकाळचे निष्ठावंत आणि सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पुणे जिल्हा बॅंकचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना शिरूरच्या मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार प्रदीप कंद हे लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शकयता आहे. यामुळे अजित पवार यांनी महायुतीतील आपला सहकारी पक्ष भाजपचा नेता फोडून जोरदार धक्का दिल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हेंना इशारा दिला होता. तसेच यंदाच्या, निवडणुकीत त्यांना पाडणारच, असे अजित पवार म्हणाले. तर, दिलीप वळसे पाटील आणि मी जीवाचं रान केल्यामुळेच ते शिरुरमधून निवडून आले, असेही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी अमोल कोल्हे विरोधात उमेदवारही तेवढाच तगडा असावा, यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एकेकाळचे अजितदादांचे निष्ठावंत सध्या भाजपमध्ये असलेले प्रदीप कंद यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी विचारणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कंद यांच्याशी अजित पवार यांची चर्चा झाली आहे.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेड, भोसरी, शिरूर-हवेली आणि हडपसर या सहा मतदारसंचा समावेश आहे. यामध्ये पाच मतदारसंघांत महायुतीतील राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचा एक आमदार आहे. यामधील काही आमदारांनी कंद यांच्या नावावर सहमती दर्शविली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीप कंद यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.
तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघाचे सलग तीनवेळा प्रतिनिधीत्व करणारे शिवाजी आढळराव पाटील यांना महायुती सरकारने नुकतेच पुणे म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आढळरावांना हे पद मिळाल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे कंद यांना उमेदवारी देताना कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी महायुतीकडून घेतली जात असल्याचे दिसून येते आहे. यांच्यासमोर संभाव्य उमेदवार प्रदीप कंद हे लोणीकंद गावचे रहिवासी असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्याबाबत प्रदीप कंद यांना विचारले असता त्यांनी ही गोष्ट फेटाळली नाही व स्वीकारली ही नाही. तसेच राज्यातील महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असणार आहे. यापूर्वी पक्षश्रेष्ठींनी जो जो आदेश दिला तो शिरसंवाद्य मानून निवडणुका लढवल्या आहेत. महायुतीकडून निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे कंद यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’ला सांगितले.
कोण आहेत प्रदीप दादा कंद?
प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पुणे जिल्हा परिषदेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून सुरूवातीला त्यांना उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना 2014 मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकी आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.