पुणे : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. कालच भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. अशातच अजित पवार गटात नाराजीनाट्य सुरु झालेले दिसत आहे. विधानसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काल असंख्य कार्यकर्ते नाराज होऊन त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी देखील माझ्या पदाचा राजीनामा देत असून यापुढील काळात मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. असे देखील दीपक मानकर यांनी म्हटले आहे. दीपक मानकर यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. असून त्यांनी सांगितलं की, २०१२ पासून मी संघटनेचं काम करत आहे. कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी दादांकडे मागणी केली होती. मागणी होत असताना अनेक कार्यकर्ते भेटले. दादा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करतात, त्यावेळी दादा विचार करू, अस म्हणत होते.
दीपक मानकर म्हणाले की, परवा तिकीट जाहीर झाले, पण त्यात नाव नव्हतं. मी कुठे कमी पडलो, हे पक्ष पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं पाहिजं. नायकवडे आणि भुजबळ यांचं काय काम आहे? मला माहित नाही. मी कधीही पार्टी कडून पैसे घेत नाही, पुढे पुढे करत नाही. कार्यकर्ता म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारा आहे. परंतु तरीही सगळ्याचा विरोध मला पत्करावा करावा लागतो. अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुनील तटकरे यांच्यावरही आरोप..
दीपक मानकर यांनी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सुद्धा आरोप केले आहेत. ‘आमच्या प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी जेवढी तत्परता रूपाली चाकणकरांचे बाबतीत दाखवली त्यांना पद वाढवून दिले तेवढी माझ्या बाबतीत का दाखवली नाही, असे आरोप त्यांनी तटकरे यांच्यावर केला आहे. घराणेशाहीच राजकारण करत बसला तर कार्यकर्त्यांचं काय? भुजबळ यांच्या घरात दिलं, आम्ही लोकसभेत एकत्रित काम केलं. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष या पदाचा शनिवारपर्यंत राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
एक पद असावे अशी माझी मागणी..
माझं मत आहे की एक पद असावे अशी माझी मागणी आहे. सत्तेचं विक्रेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. रुपाली चाकणकर यांना आता काही पद देऊ नये. अनेक महिला राज्यात काम करत आहेत. आमच्या भावना प्रांताध्यक्षांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. मी दादांसोबत आता फक्त कार्यकर्ता म्हणून काम करणार. मला अनेक ऑफरदेखील येत आहे. कार्यकर्त्यांनी ठरवलं तर या निवडणुकीत फटका बसू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.