पुणे : बारामती येथील सरकारी मेडिकल कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये शासकीय प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचं चित्र समोर आलं आहे. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक आमदार असलेले अजित पवार यांचं देखील नाव नाही. तसेच राज्यसभा खासदार शरद पवार आणि माझे नाव त्या ठिकाणी नव्हतं, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
बारामतीत अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील यांच्या नावाचा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. तसेच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाला होती. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझं नाव बॅनरवर नव्हतं याचं मला दुःख नाही. मात्र, स्थानिक आमदार अजित पवार यांचे नाव तिथे असणे आवश्यक होतं. त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण होतं का नाही हे मला माहीत नाही. मात्र, मला आणि शरद पवारसाहेबांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नव्हते, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
तसेच सरकारकडून प्रोटोकॉल पाळणं आवश्यक आहे. आमच्या मतदारसंघांमध्ये एखादा कार्यक्रम होणार असेल, तर त्याचं निमंत्रण आम्हाला मिळणं आवश्यक आहे. भले आम्हाला स्टेजवर बसायला मिळालं नाही, तरी तो कार्यक्रम खाली बसून अटेंड केला असता. मला आणि शरद पवार साहेबांना या कार्यक्रमाला जायला फार आनंद झाला असता, असंही सुळे यावेळी म्हणाल्या.
पुढे म्हणाल्या, एखाद्या सरकारी कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावणे हा सरकारचा प्रोटोकॉल आहे. स्थानिक आमदार म्हणून अजित पवारांचं नाव असणे आवश्यक होतं ते आमदार आहेत. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांचं नाव आणि फोटो असणं आवश्यक असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.