देहू : काही दिवसांपूर्वी अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तसच बारसकर यांनी मी देहूतून आलो आहे, जरांगे यांनी उपोषण सोडावे असा संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे, असे म्हटले होते. मी देहूतून आलो आहे त्यांच्या या वक्तव्यावर आता संत तुकाराम महाराजांच्या वंशजांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बारसकर आणि आमचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्याशिवाय, देहू संस्थानकडून अजय बारसकर यांचं नामकरण करण्यात आले आहे. त्यांचं नाव अजय बारसकर नसून अजय बावळटकर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘बारसकर हा माणूस देहूतील नाही. त्याला कोणत्याही प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा अधिकार नसून अजय बारसकर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नाही’ असे सांगण्यात आले आहे.
त्या उलट, देहू संस्थानकडून ते मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या अजय बारसकर यांचा निषेध देहू संस्थानकडून व्यक्त करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर खोटारडा माणूस असल्याची टीका केली होती. जरांगे रोज पलटी मारतात, त्यांच्या अनेक गुप्त बैठका झाल्या, असे घणाघाती आरोप अजय बारसकर यांनी केले होते. अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली.