यवत(पुणे): ॲग्रीस्टॅक योजना ही कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातही तहसीलदार अरुण शेलार व तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीऐंदी येथील दरेकरवाडी येथे कृषी सहाय्यक विनायक जगताप, ग्राम महसूल अधिकारी बालाजी जाधव, मेजर अभिमन्यू जाधव यांच्या पुढाकाराने विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ‘ॲग्री स्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू असून ॲग्री स्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार करण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे अशी माहिती उपविभागीय ( प्रांत) अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.
बोरीऐंदी येथील दरेकरवाडी येथे घेतलेल्या सदर कॅम्पसाठी सीएससी केंद्र संचालक सनी भागवत व रामभाऊ ठोंबरे यांचे विशेष सहकार्य लाभले. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ भविष्यात फार्मर आयडीच्या माध्यमातून देता येणार असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी ग्रामपंचायत कार्यालय अथवा सीएससी सेंटरच्या माध्यमातून काढून घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक विनायक जगताप यांनी यावेळी केले आहे.
या कॅम्पसाठी रामदास दरेकर, साहेबराव यादव, अशोक दरेकर, महादेव कुदळे, शंकर दरेकर, नारायण दरेकर, यदूनाथ दरेकर, कुंडलीक कुदळे, शिवाजी दरेकर, तानाजी दरेकर, पोपट यादव, सचिन दरेकर, दौलत कुदळे, विठ्ठल कुदळे, युवराज जगताप, भाऊसाहेब दरेकर, मनोज कुदळे, सारीका कुदळे, विशाल दरेकर, सोमनाथ दरेकर, मयुर ताम्हाणे या शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपले शेतकरी ओळखपत्र काढून घेतले. तसेच सुट्टीच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत कॅम्प आयोजन केल्याबद्दल कृषी विभाग व महसूल विभागाचे आभार मानण्यात आले.