बारामती : येथे आजपासून सुरु झालेल्या ‘कृषिक २०२३’ या कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली असून आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदर शरद पवार हे २३ तारखेला या प्रदर्शनास भेट देणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती कृषी विज्ञान केंद्र, (KVK), अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषिक २०२३’ या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
१७० एकरवर या कृषिकचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन १९ ते २२ जानेवारी दरम्यान खुले राहणार आहे. ३ ते १८ जानेवारी यादरम्यान स्टार्टअप किंवा इतर इन्होव्हेटर यांच्याकरिता वेबीनारचे आयोजन केरण्यात आले होते.
‘कृषिक २०२३’ प्रदर्शनात मायक्रोसॉफ्टमार्फत बारामती येथे उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज’ या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना तसेच उद्योजकांना दाखवण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असे अनेक नवनवीन उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे.