दीपक खिलारे
इंदापूर : कृषी उत्पन बाजार समितीच्या वतीने इंदापूर कृषी महोत्सव २०२४ अंतर्गत २४ ते २८ जानेवारी दरम्यान पाच दिवसीय कृषी, पशु-पक्षी, जनावरे, मत्स्य प्रदर्शनात पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजाराचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केले आहे. कृषी प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विलास माने, उपसभापती रोहित मोहोळकर, आमदार यशवंत माने व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
कृषी प्रदर्शन व घोडे चाल स्पर्धेचे उद्घाटन २४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आमदार यशवंत माने यांच्या हस्ते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर समारोप, बक्षीस वितरण समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते, दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ जानेवारीला सकाळी होणार आहे. इंदापूर कृषी प्रदर्शनास सर्वांना मोफत प्रवेश आहे.
शेतमाल उत्पादनातील अग्रेसर प्रगतशील शेतकरी व नियमित शेतमाल खरेदी-विक्रीचे उत्कृष्ट व उच्चांकी कामकाज करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे. या वेळी बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय फडतरे, मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, मनोहर ढुके, संदीप पाटील, रुपाली चाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे व प्रभारी सचिव संतोष देवकर उपस्थित होते.
प्रदर्शनात काय पहाल?
बाजार समितीच्या इंदापूर कृषी महोत्सव २०२४ अंतर्गत कृषी प्रदर्शनात शेती उत्पादने, बी-बियाणे, शेती औजारे, साधने, ऑटो मोबाईल्स, गृहोपयोगी वस्तू तसेच कृषी अनुशंगिक यांत्रिक साहित्य याबाबतचे २५० स्टॉल, ५० खाद्य स्टॉल, पशु-पक्षी, जनावरे प्रदर्शन आणि घोडे बाजार तसेच घोडे चाल (स्वाल), नाचकाम स्पर्धा शिवाय स्मार्ट घोडे, नर-मादी, नुकरा, मारवाड, काटेवाडी, सिद्धी हे घोडे बाजाराचे प्रमुख आकर्षण आहे.
मनोरंजनाचेही कार्यक्रम
‘डॉग शो’ हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व ‘महाराष्ट्राची लोककला’ हा कार्यक्रम तसेच मुली-महिलांसाठी मोनाली करंदीकर यांचा ‘फुल टू धमाल’ व ‘खेळ पैठणी’चा हा सुप्रसिद्ध कार्यक्रम आयोजित केला आहे. लहान व प्रौढांसाठी मनोरंजनाचे खेळ व खवय्यांसाठी खाऊगल्ली असे शिस्तबद्ध नियोजन केले जाणार आहे.
इंदापूर शहर नवीन प्रशासकीय इमारतीपासून विद्यार्थी व नागरिकांसाठी पाच दिवस सकाळी १० ते रात्री १० पर्यंत मोफत बससेवा सुविधा असे प्रदर्शनाचे नियोजन आहे. चालू वर्षी नव्याने अश्वरोहणातील ऑलिम्पिक क्रीडा प्रकार प्रात्यक्षिके, महाराष्ट्र लोककला, बुलेट रायडींग असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.