पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या मानव आणि पशुधनावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. सध्या ऊसतोडणीला सुरवात झाल्यामुळे बिबट्यांच्या अधिवासाला धोका पोहोचत आहे. अधिवासच उद्ध्वस्त झाल्यामुळे ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेले बिबट्या आक्रमक होऊन मनुष्यावर हल्ला करत आहेत. मनुष्य आणि बिबट्या हा संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येसह शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप करत पुण्याच्या मंचरमध्ये एका व्यक्तीने चक्क स्वतःलाच बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात कैद करून घेतले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार गांभीर्याने घेत नसल्याने त्यांनी स्वतःच बिबट्याचे भक्ष्य होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याच्या निर्णयामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
बिबट्याच्या पिंजऱ्यात बसून आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचे नाव दत्ता गांजाळे असे आहे. आंबेगाव तालुक्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ते प्रमुख आहेत. गांजळे गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, प्रशासन त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या गांजळे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. परिसरातील शेतात भटकून त्यांनी बिबट्याला कैद करण्यासाठी ठेवण्यात आलेला पिंजरा शोधला आणि ते स्वतः बिबट्याचे भक्ष्य होण्यासाठी पिंजऱ्यात जाऊन बसले. प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचेच नसेल तर मी स्वतःला बिबट्याच्या स्वाधीन करतो, अशी भूमिका गांजळे यांनी घेतली.
दरम्यान, गांजळे यांनी उचललेल्या या आक्रमक पवित्र्याची चर्चा पंचक्रोशीत झपाट्याने पसरली. प्रशासनाला याविषयी माहिती होताच गांजळे यांचा तत्काळ शोध घेण्यात आला. वनविभागाने पाहणी केली असता, मंचरपासून सात किलोमीटर अंतरावरील चांडोली बुद्रुक गावातील पिंजऱ्यात गांजळे आंदोलनासाठी बसल्याचे आढळले.
गांजाळे यांना तहसीलदार संजय नागटिळक, वन अधिकारी स्मिता राजहंस आणि मंचर पोलिसांनी पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची विनंती केली. मात्र, गांजाळे आपल्या मागण्यांवर ठाम होते. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, असा हट्ट त्यांनी धरला.
जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र असल्याने शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द करा, कांद्याला अनुदान द्यावे, निर्यात बंदी उठवण्यात यावी, दुधाला योग्य बाजारभाव मिळावा, अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या पिकांची नुकसानभरपाई मिळावी, पीक विमा मिळावा, शासनाने शेतीसाठी वाढवलेली पाणीपट्टी कमी करावी, अशा मागण्या गांजाळे यांनी केल्या.
अखेर प्रशासनाने मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दत्ता गांजळे यांनी आंदोलन स्थगित केले.