पुणे : येरवड्यातील कल्याणीनगर भागात हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा सुरू असल्याचे समोर आले आहे. नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत तब्बल ७० ते ८० नागरिक एकत्रित करून साऊंड सिस्टीम सुरू ठेवली होती. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दोन हॉटेलच्या मालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याणीनगर येथील कुकू हॉटेलचे मालक खुशबू वर्मा, मॅनेजर फैयाज फाकिरद्दिन मिर (३२) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून पोलीस अंमलदार प्रवीण खाटमोडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री उशिरा कल्याणीनगर येथील हॉटेल कुकू याठिकाणी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी हॉटेलमध्ये विनापरवाना रात्री साऊंड सिस्टीम सुरू असल्याचे निदर्शनास आले. तर, यावेळी हॉटेलमध्ये ४८ नागरिक उपस्थित होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधित हॉटेल मालक, मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या कारवाईत कल्याणीनगर येथीलच हॉटेल ‘ओ आय ब्रू’ येथे छापा कारवाई केली. त्यावेळी येथेही २५ ते ३० नागरिक आढळून आले. उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून त्यामध्ये अवैधरीत्या साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेलचे मालक अमन प्रेम तलरेजा (३०, रा. कोरेगाव पार्क), मॅनेजर निखिल बेडेकर (३६, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण घडल्यानंतर या भागात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल, पबचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने येथे कारवाई करून तब्बल २० हून अधिक पबला टाळे ठोकले आहे. मात्र, काही दिवसांतच या भागातील हॉटेल, पब संस्कृती पुन्हा सुरू उफाळून वर आल्याचे दिसून येत आहे. विशेषतः कल्याणीनगर भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल आस्थापना सुरू राहत असल्याने येथील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.