पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पक्का निर्धार केला. अजित पवारांविरोधात त्यांनी शड्डू ठोकला आहे. त्यानंतर अजित पवार गटाने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर गुरूवारी (ता. १४) मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना चर्चेसाठी बोलावले. विजय शिवतारे यांनी तब्बल ७ तास थांबून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या तासाभराच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला. शिवाय महायुतीत ज्याला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी काम करायचं, अशी समज देखील दिल्याची माहिती मिळत आहे.
महायुतीकडून बारामतीची जागा अजित पवार गटाला देण्यात येणार आहे. त्यात आता शिंदे गटात असलेल्या विजय शिवतारेंनीच अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. मात्र विजय शिवतारेंच्या निर्णयामुळे बारामतीत अजित पवारांना मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विजय शिवतारेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीसाठी बोलवले होते. या वेळी शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी थांबवून ठेवले. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून स्थानिक परिस्थितीची माहिती दिली. लोकांची मनस्थिती, पवार विरुद्ध पवार यात जे ४८ टक्के लोक पवारांच्या विरोधात आहेत, त्यांना मतदानाची संधी द्यायला हवी आणि सध्याची स्थानिक नेत्यांची इच्छा काय आहे, याची माहिती दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले. या सर्व परिस्थितीचा विचार महायुतीने करावा, अशी इच्छा विजय शिवतारे यांनी व्यक्त केली.