लोणी काळभोर : सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥ तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥
जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कदमवाकवस्ती येथे मंगळवारी ( ता.2 ) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुक्कामी पोहोचला होता. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली होती. आज बुधवारी सकाळी बारस सोडण्यासाठी ग्रामस्थांनी वारक-यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. कदमवाकवस्ती येथे बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पूजा, महाअभिषेक व आरती करण्यात आली. ग्रामस्थांचा निरोप घेऊन पालखीचे बुधवारी (ता.3) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाले.
पालखी सोहळा जुना पुणे सोलापूर महामार्गावरील पुलावरून लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश केल्यानंतर लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, उपसरपंच प्रियांका काळभोर, राजाराम काळभोर, आप्पासाहेब काळभोर, संतोष भोसले यांनी स्वागत केले. पाषाणकर बागेमार्गे हा पालखी सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ पोहचला. तेथे सार्वजनिक आरती व पूजा करण्यात आली. यावेळी ह.भ.प. विनोद महाराज काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती सनी उर्फ युगंधर काळभोर, ग्रामपंचायत सदस्य योगेश काळभोर, राजेंद्र जोशी, ग्राम विकास अधिकारी एन एन गवारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाविकांनी ‘पुंडलिका वरदे’चा गजर केला. ग्रामस्थांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. पालखीला मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली होती. या वेळी अनेकांनी सेल्फीचा आनंद घेतला. टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत लोणी काळभोर ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी साडेआठच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. या वेळी पालखी मार्गावर हरिनामाचा अखंड जयघोष सुरु होता.
दरम्यान, लोणी काळभोर मधून पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर या वारीत अपर तहसीलदार तृप्ती कोलते, मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद व तलाठी पद्मिनी मोरे सहभागी झाल्या. त्यांनी वारक-यांबरोबर पायी चालून या सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर हा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला.