पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पुणे शहरात मनसेला मोठा धक्का बसला आहे. मोरे हे मनसेकडून सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. माजी नगरसेवक असलेल्या वसंत मोरे यांनी आपल्या हातोडा स्टाईलने पुण्यात स्वतःचे वलय निर्माण केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वसंत मोरेंना फोन केला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना वसंत मोरे यांनी सांगितलं.
काय म्हणाले वसंत मोरे?
राजीनाम्यानंतर मला राज ठाकरेंचाही फोन आला होता. पण, मी त्यांचा फोन घेतला नाही, असे वसंत मोरेंनी म्हटले. तर, मला अनेक राजकीय पक्षांचे फोन आले असून शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही फोन केला होता, असेही त्यांनी सांगितले. तर, काँग्रेस नेते माजी आमदार मोहन जोशी यांनीही भेट घेऊन पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. असं वसंत मोरे म्हणाले.