मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर शाब्दिक वार करत आहेत. एकेकाळी काका शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या असणाऱ्या अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर काकांना पाडण्याची भाषा केली होती. सोशल मीडियावर हे वक्तव्य व्हायरल झाले होते. या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी एक जुना व्हीडिओ ट्विट केला आहे. काकांचा अभिमान बाळगणारे अजितदादा आता त्याच काकांना पाडण्याची भाषा करत आहेत, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे.
या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांना काही प्रश्न देखील विचारले आहेत. रोहित पवार म्हणाले की, अजित काका तुमचा हा जुना व्हिडिओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्यापलीकडचा आहे. जे कधीही जमलं नाही ते भाजप फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेतंय, हे दुर्दैव! जमलं तर गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या युवांवर का अन्याय केला जातो? या का? चं उत्तरही त्यांना विचारलं तर बरं होईल, असा सल्ला रोहित पवार यांनी अजित पवारांना दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना लक्ष्य केले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजितदादांनी शरद पवार यांना पाडण्याची भाषा केली होती. त्यांनी म्हटले होते की, सका पाटलांचा प्रचार करताना जॉर्ज फर्नांडिस ‘पापापा’ असं लिहून प्रचार करत होते. म्हणजेच ‘पाटलाला पाडलं पाहिजे’. आता ‘काका का’ असे लिहून प्रचार केला पाहिजे, अशी भाषा वापरत अजितदादांनी शरद पवारांना थेट आव्हान दिले होते. या वक्तव्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. “पुतण्या गद्दार निघाला. वेळ अशी येईल की वेळ येईल विचारण्याची काका का असे करता? माफ करा चुकी झाली आणि या वेळेस २०१९ सारखी माफी नाही. गद्दारांना माफी नाही!”, असे खडे बोल जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले होते.