पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर आपला पती ‘गे’ असल्याची माहिती पत्नीला समजली. त्यानंतर तिला मोठा धक्काच बसला. याबाबत सासरच्या लोकांना माहिती असताना देखील त्यांनी सुनेपासून हा प्रकार लपवला. लग्न करण्यापूर्वी सासू, नणंद तसेच पतीने महिलेला ‘गे’ असल्याचे सांगितली नाही.
तरीही महिलेने त्याच्यासोबत दोन वर्ष संसार केला. मात्र, सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर मात्र, महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक आणि छळाची तक्रार दाखल केली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 33 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिचा 30 वर्षीय पती, 64 वर्षीय सासू, वानवडी येथे राहणाऱ्या 40 वर्षीय नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार वानवडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत जानेवारी 2022 ते 17 एप्रिल 2024 दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लग्न जानेवारी 2022 मध्ये तीन वर्षांनी लहान असलेल्या कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील आरोपीसोबत झाले होते. लग्न ठरविताना सासरच्या लोकांनी मुलगा ‘गे’ असून त्याला पुरुषांमध्ये रस असल्याची माहीती तरुणीला व तिच्या कुटुंबीयांनपासून लपवली. तसेच मुलगा ‘गे’ असल्याची माहिती समाजात समजली तर बदनामी होईल. यामुळे लग्नाचे नाटक केले.
यासोबतच या महिलेला घरातील सर्व कौटुंबिक खर्च करायला भाग पाडले. आरोपी पतीने आईचा देखील खर्च करण्यास भाग पाडले. तसेच शरीरसुखापासून वंचित ठेवले. किरकोळ कारणावरून फिर्यादीला सतत मारहाण करण्यात आली. तसेच, वारंवार शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. सासू आणि नणंदेने या महिलेला ‘आम्हाला तुझ्यापेक्षा श्रीमंत घरातील ४० तोळे सोने देणारी सून मिळाली असती. तुझ्या मुळे माझ्या मुलाचे आयुष्य खराब झाले, असं म्हणत सतत टोमणे मारून तिचा शारीरिक, मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.