सागर घरत
करमाळा : गेल्या अनेक वर्षांपासून करमाळा तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या घरत वाडी या गावाला जाण्यासाठी रस्ताच नव्हता. अनेक मागण्यांवरही असंवेदनशील प्रशासन व लोकप्रतिनिधींना घाम फुटला नाही. अखेर चक्क घरतवाडी गावच ग्रामस्थांनी विक्रीला काढले. सर्व निवडणुकांवर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांना अखेर यथ आले. युवक व ग्रामस्थांच्या अथक संघर्षानंतर व अनेक नाट्यमय घडामोडीनंतर कुंभारगाव-घरतवाडी रस्त्यावर अखेरचा डांबराचा थर देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ग्रामस्थांनी स्वप्नात पाहिलेला डांबरी रस्ता आज सत्यात उतरत असल्याचे समाधान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसत आहे.
पूर्वीच्या काळी घरतवाडीला जाणारा रस्ता दगडी होता. ग्रामस्थांनी डांबरीकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली. मात्र, लोकप्रतिनिधी वा प्रशासकीय यंत्रणेने याकडे लक्ष दिले नसल्याने येत्या काळात गावच विक्रीला काढण्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले होते. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरून पायी चालणे ग्रामस्थांना मुश्किल झाले होते. अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ लोकांना कुभारंगाव या गावात यावे लागत होते. एसटी किंवा इतर वाहतूक घरतवाडीत येण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
नागरिक, वृद्ध तसेच विद्यार्थ्यांना कुंभारगावातील शाळेत येण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न रस्त्याच्या कामामुळे सातत्याने दुर्लक्षित राहिलेला होता. घरतवाडीमध्ये आचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्या निवारण्यासाठी करमाळा अथवा बारामतीकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र, केवळ नादुरुस्त रस्त्याअभावी अनेकांना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणे होती. यासाठी घरतवाडी युवक व ग्रामस्थांनी अथक संघर्ष केला.
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर डांबरी रस्ता पूर्ण होण्यास यश आले आहे. संघर्ष केल्यानंतर यश हमखास मिळतेच याचा परिचय या कामातून आला आहे. स्वप्नात पाहिलेला डांबरी रस्ता आज सत्यात उतरत आहे. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती आनंद पहावयास मिळत आहे.