हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) लोणी काळभोर टोल नाका ते कासुर्डी टोल नाका या सुमारे २५ किलोमीटरच्या टप्प्यात सहा इंच उंचीचा दुभाजक आहे. स्थानिक नागरिकांनी दुभाजकाची उंची वाढविण्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही, प्रशासनाने त्याकडे आजवर दुर्लक्षच केले आहे.
केवळ दुभाजकाची उंची कमी होती, या कारणावरून रविवारी (ता. २९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला होता. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी या घटनेत तिघेजन गंभीर जखमी झाले होते. निरापधारांचे बळी गेल्यावर याची उंची वाढणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हडपसरपासून काही किलोमीटर गेल्यानंतर लोणी काळभोर टोल नाका सुरू होतो. त्यापासून ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंतच्या २५ किलोमीटरच्या मार्गावर अवघा सहा इंच इतक्या उंचीचा आणि दोन-चार फूट इतक्या रुंदीचा दुभाजक आहे. फॉर्च्युनर, इनोव्हा, स्कॉर्पिओ, जीप आदी मोठ्या गाड्यांसह एसटी, बस, ट्रक आदी मोठी वाहने अपघातानंतर सहजरीत्या कमी उंचीच्या दुभाजकावरून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन, समोरून येणाऱ्या वाहनांवर आदळत असल्याची सद्यःस्थिती आहे. सध्या केवळ सहा इंचाचेच दुभाजक आहेत.
१० मार्च २०१९ या दिवशी ‘आरआरबी’चा करार संपल्याने या महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचए) आली आहे. मात्र, त्यानंतर दुभाजक उंचीचा प्रश्न दूरच, या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याची सद्यःस्थिती आहे. महामार्ग उभारणीची रचना जुनीच आहे. आता दुभाजकाची उंची एक फुटापेक्षा कमी आहे. डांबरीकरण झाल्यानंतर ही उंची आणखी कमी होते, याकडे कोणी लक्ष देत नाही.
केंद्र सरकारच्या वतीने महामार्गाची निर्मिती करणे, त्यांचे व्यवस्थापन व दुरुस्ती, महामार्गावरील घडामोडींबाबत सरकारला सल्ला देणे, संशोधन करणे, प्रवाशांना सुविधा देणे ही कामे महामार्ग प्राधिकरणाची आहेत. मात्र, महामार्गावरील अपघातांबाबत प्राधिकरण उदासीन असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणाच्या मूळ आराखड्यातील अनेक बाबींना प्राधिकरणाने व ठेकेदारांनी सोईस्कर फाटा दिला आहे. याबाबत विविध ग्रामपंचायतींनी प्राधिकरणाकडे त्रुटींबाबत पाठपुरावा केला. मात्र, अर्जांची दखल घेतली जात नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येत लक्ष घालण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
या महामार्गावर कवडीपाट ते उरुळी कांचनपर्यंत वाहतूक कोंडीच्या समस्येला कायम सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळेचा व इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. महामार्गालगत उभे राहत असलेले मोठमोठे बांधकाम प्रकल्प, व्यवसाय व मंगल कार्यालय आदींमुळे वाहतुकीचा अतिरिक्त ताण महामार्गावर येत असल्याने पथकर वसुली थांबली असली, तरी वाहनकोंडी ही नित्याची बाब झाली आहे.
दरम्यान, गाडी दामटवून पुढे जाण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याचा विचार करून रस्ता दुभाजकाची उंची वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा यापुढेही एखादे वाहन भरधाव वेगात आले अन् त्याला पुढे अडथळा निर्माण झाला तर थेट ते दुभाजक ओलांडून पलीकडे जाण्याची शक्यता वाढते आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन म्हणाले, “पुणे – सोलापूर महामार्गावर पैसे देऊन मरण विकत घेण्याची वेळ प्रवाश्यांवर आली आहे. यांचे कोणालाही सोयरसुतक नाही. त्रुटीसंबंधित भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांना उरुळी कांचनसह पूर्व हवेलीतील अनेक ग्रामपंचायतीनी विनंती व अर्जाची भाषा केली, मात्र संबंधितांना कळेनाशी झाली आहे.”