पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली पहिली यादी जाहीर तेव्हा बंडात साथ देणाऱ्यांना संधी देण्यात आली होती, परंतु यामध्ये अजित पवारांचे विश्वासू समजले जाणारे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांना दुसऱ्या यादीमध्ये संधी देण्यात आली आहे.
वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा होती. मात्र, पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर न झाल्याने आता चर्चांना उधाण आले होते. पुण्यातील पोर्शे कार हिट अॅण्ड रन प्रकरणात सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत केली असल्याचा आरोप झाला होता. तसेच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली होती. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला होता.
वडगाव शेरी विधानसभेचा वाद दिल्ली दरबारी सुद्धा गेला होता. अखेर वडगाव शेरी मतदार संघातून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना संधी देण्यात आली आहे.
सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या यादीची घोषणा केली. इस्लामपूरमधून निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन, जयंत पाटील यांना आव्हान देण्यासाठी अजित पवार यांनी मोठा डाव टाकल्याचे बोललं जात आहे. तासगावमधून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शिरूर-हवेलीमधून माऊली आबा कटके यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या समोर आता महाविकास आघाडीच्या अशोक पवार यांचे आव्हान असणार आहे. आता ७ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. एकूण ४५ उमेदवारांची घोषणा आतापर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीत कुणाला मिळाली उमेदवारी?
- वडगाव शेरी : सुनील टिंगरे
- वांद्रे पूर्व : झिशान सिद्दीकी
- अणूशक्तीनगर : सना मलिक
- तासगाव : संजय काका पाटील
- इस्लामपूर : निशिकांत पाटील
- शिरुर : माऊली कटके
- लोहा-कंधार : प्रताप पाटील चिखलीकर