पुणे : शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम अजित पवार गट करत आहे. अशोक पवार यांचे कट्टर विरोधक व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत, त्यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करण्यास जोरदार सुरूवात झाली आहे.
इंदापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्यात रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तथा माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, भाजप नेते राजेंद्र कोरेकर, वडगाव रासाई-मांडवगण फराटा गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी फराटे, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक आत्माराम फराटे, पंचायत समिती सदस्य (मांडवगण फराटा गण), मांडवगण फराटा सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर आण्णा घाडगे, राजेंद्र गदादे, लक्ष्मण बापू फराटे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
वडगाव रासाई आणि मांडवगण फराटा हा आमदार अशोक पवार यांचा गड मानला जातो. त्या गडातील महत्वपूर्ण मोहरे फोडण्यात अजित पवार यांना यश आले आहे. आमदार अशोक पवार यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि अजित पवार गटाचे शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांच्या माध्यमातून हे पक्ष प्रवेश झाले आहेत. त्यामुळे विश्वासू सहकाऱ्यांकडूनच अशोक पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याचे काम केले आहे.
अजित पवार म्हणाले की, दादा पाटील फराटे हे १९९१ पासून माझ्यासोबत होते. यातील बहुतांश लोक माझ्यासोबत होते. इंदापूर तालुक्यात मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी या, असा आम्ही त्यांना निरोप दिला होता. त्यानुसार दादा पाटील फराटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत आहे. या नेत्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शिरूरमध्ये ताकद वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी त्यांचे पाठबळ मिळेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.