पुरंदर : न्यायालय परिसरातील पायाभूत सोयीसुविधा, ऑनलाईन सेवेतील त्रुटी, ज्युनिअर वकिलांना स्टायफंड अशा वकिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र उमाप यांनी वकिलांना दिली आहे.
सासवड बार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राजेंद्र उमाप यांचा अक्षय तृतीयाचे औचित्य साधून सत्कार समारंभाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील ग्वाही उमाप यांनी उपस्थित वकिलांना दिली आहे. यावेळी सासवड येथील न्यायाधीश एस.के. देशमुख, न्यायाधीश एम.एस भरड, वर्धा येथील न्यायाधीश निलेश काळे, सासवड बारचे अध्यक्ष ॲड. बाबासो पिलाणे यांसह कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ॲड.राजेंद्र उमाप यांनी वकिलांसमोर असलेल्या विविध समस्यांचा आढावा घेतला. महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेच्या वतीने वकिलांसाठी घेतलेले निर्णय व प्रस्तावित धोरणांची माहिती दिली. यावेळी ॲड.अविनाश भारंबे, ॲड.कला फडतरे, ॲड.शिवाजी कोलते, ॲड.बाजीराव झेंडे, ॲड.दिलीप निरगुडे या जेष्ठ वकिलांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. सुमित पवार यांच्या वकिली इस्टाग्राम या चॅनेलचे वकिल परिषदेचे अध्यक्ष व कार्यकारणीच्यावतीने उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सासवड बारचे उपाध्यक्ष ॲड. गणेश उरणे, सचिव ॲड.राहुल कोलते, सहसचिव ॲड. अक्षय नाझिरकर, खजिनदार ॲड.ज्योती जगताप, हिशोब तपासणीस ॲड. शुभम राऊत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रकाश खाडे यांनी तर सुञसंचालन ॲड. मनोहर पवार यांनी केले.