भिगवण : मयूर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भिगवण या पतसंस्थेची संचालक मंडळाची 2023 ते 2028 या कालावधीची निवडणूक पार पडली. यामध्ये पतसंस्थेच्या चेअरमनपदी ॲड. पांडुरंग जगताप तर व्हाईस चेअरमनपदी सुनील कन्हेरकर यांची बिनविरोध निवड झाली.
पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये संस्थेच्या नूतन संचालकाची सभा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इंदापूर जे. पी. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक पार पडली. यात संस्थेचे चेअरमन म्हणून जगताप व व्हॉईस चेअरमनपदी कन्हेरकर या दोघांचे एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सहाय्यक निबंधक जे. पी. गावडे यांनी जाहीर केले.
संस्थेचे संचालक म्हणून संस्थापक प्रकाश ढवळे, शंकरराव गायकवाड, विकास वाघ, प्रदीप बोरा, संजय खाडे, नलिनी कदम यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच नवीन संचालक म्हणून युवराज विधाते, राजेंद्र वाघ, नंदकुमार धांडे, संजय सवाने व साधना काळे यांची नूतन संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रकियेनंतर संस्थेचे संस्थापक प्रकाश ढवळे व सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीवेळी बोलताना संस्थेचे चेअरमन ॲड. पांडुरंग जगताप यांनी सांगितले की, संस्थेचे सध्या रौप्यमहोत्सवी वर्ष चालू असून, संस्थेची वाटचाल चांगल्याप्रकारे करण्यासाठी संस्थेचे संचालक व सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करण्यात येईल.
यावेळी संचालक विकास वाघ, राजेंद्र वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक प्रदीप नांदगुडे यांनी केले. आभार व्हॉईस चेअरमन सुनील कन्हेरकर पाटील यांनी मानले.