पुणे : संसदेच्या आवारात काल दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवर उडी मारत गोंधळ घातला. तर एक महिला आणि तरूणाने संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडल्या. गोंधळ घआलणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील झरेगावचा तरूण अमोल शिंदे याचा समावेश आहे. हे प्रकरण आता कोर्टात गेले असून, अमोल शिंदे याला कायेशीर मदतीची गरज आहे. दरम्यान, शिंदे याला कायदेशीर मदत करणार असल्याचे प्रसिद्ध वकील अॅड. असिम सरोदे यांनी जाहीर केले आहे. सरोदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली आहे.
अॅड. असिम सरोदे यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार, अमोल शिंदे या तरूणाला शिक्षा झालीच पाहिजे. कारण शिंदे याने संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. मात्र, या गुन्ह्यासाठी अमोल शिंदे याच्यावर लावलेली कलमे चुकीची आहेत. त्यामुळेच मी अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार आहे.
अॅड. असिम सरोदे यांनी या वेळी राजकारण्यांवर देखील सडकून टीका केली. ते म्हणाले की, संसदेतील लोक असे कोणते काम करीत आहेत, ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोलचा उद्देश कुणाला दुखावण्याचा अथवा इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा होता. त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी, असे माझे मत आहे.
याबाबत धनंजय शिंदे यांनी लिहिलेले विचार पटल्याचेही अॅड. सरोदे यांनी सांगितले. लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय. तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे. त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली?