खडकवासला, (पुणे) Admirable : पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात बुडत असलेल्या पाच मुलींना आपल्या जीवाची पर्वा न करता एका ६० वर्षीय शेतकऱ्याने वाचविले आहे. (Admirable)
शेतकऱ्याचे होतयं सर्वत्र कौतुक
संजय सिताराम माताळे (वय – अंदाजे ६० , रा. गोऱ्हे खुर्द ता. हवेली) असे त्या व्यक्तीचे नाव असून, ते ५ मुलींना जीवनदान देणारे देवदूत ठरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकवासला धरणात सकाळी झालेल्या ९ मुलींच्या अपघाताने सगळ्या शहराला हादरवून टाकले. फिरण्यासाठी आलेल्या बुलढाणा जिल्हातील ९ मुली पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात बुडाल्या. या अपघातात दोन मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला असून ७ मुलींना वाचवण्यात आले आहे. ज्या व्यक्तीने प्राणाची पर्वा न करता या मुलींना वाचवण्यासाठी संजय माताळे यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. त्यांच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक करत आहेत.
संजय सिताराम माताळे हे सावडण्याच्या विधीसाठी आलेले असताना यांना अचानक जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. माताळे आवाजाच्या दिशेने पळत गेले असता त्यांना मुली पाण्यात बुडत असलेल्या दिसल्या क्षणांचा विलंब न करता त्यांनी पाण्यात उडी घेतली. तोपर्यंत राजेंद्र जोरी, कालिदास माताळे, शिवाजी माताळे, व रमेश भामे हे स्थानिक किनाऱ्याजवळ मदतीसाठी आले होते. संजय माताळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुली व एका महिलेला एक-एक करुन पाण्याच्या कडेला आणले.
जय माताळे हे बुडालेल्या एकेकीला कडेला आणत होते व राजेंद्र जोरी, कालिदास माताळे, शिवाजी माताळे व रमेश भामे हे त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढत होते. संजय माताळे यांनी धाडसाने पोहत पाचजणींना बाहेर काढले आणि इतरांनी प्रथमोपचार करुन तातडीने उपचारांसाठी खानापूर येथे दाखल केल्याने त्यांचे प्राण बचावले. दुर्देवाने अथक प्रयत्नांनंतरही दोन मुली संजय यांच्या हाताला न लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबत बोलताना संजय माताळे म्हणाले की, “ओरडण्याचा आवाज आला तसा मी पळालो आणि पाण्यात उडी घेतली. माझ्या मागे काही लोक मदतीसाठी आले होते. पाच जणींना मी बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले व काठावर थांबलेल्यांकडे दिले. दोघी माझ्या हाताला लागल्या नाहीत. मित्र, नातेवाईक खुप फोन करत आहेत. खुप चांगलं काम केलं असं म्हणत आहेत. डोळे भरुन येत आहेत.”