वाघोली : पुणे महानगरपालिकेत समावेश झालेल्या वाघोलीरांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना सहन करावा लागत आहे. याच अनुषंगाने शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वाघोलीतील रस्ते, ड्रेनेज, अंतर्गतरस्ते, कचरा, पावसाळी पाणी याबाबत महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांच्यासमोर बैठक घेत, वाघोलीतील समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्यासह उपायुक्त किशोरी शिंदे, वडगावशेरी नगररोड क्षत्रिय कार्यालयाचे आयुक्त सोमनाथ बनकर, माजी उपसरपंच शिवदास उबाळे, वाघोली ग्रामस्थ तसेच सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदारांच्या प्रश्नांना अधिकारी कर्मचारी यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त यांनी सर्वांना सोबत घेत स्वतः रस्त्यावर उतरत वाघोली परिसरातील समस्यांची पाहणी करत यातून मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार अशोक पवार यांना दिले. पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्याने, तसेच सोसायटीमध्ये शिरणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणी, ड्रेनेजच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात अशी मागणी वाघोलीतील नागरिक आणि आमदारांनी अतिरिक्त आयुक्तांसमोर केली.
या प्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तर काही सोसायटीतील रहिवाशांनी लोहगाव रोडवरील एका खाजगी मॉलमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार अतिरिक्त आयुक्तांकडे केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांना सोबत घेत. समस्यांची पाहणी करत संबंधितांच्या परवानग्या तपासून कारवाईची आदेश दिले. तसेच प्रियंकानगरी परिसरातील काही सोसायट्यांमध्ये पाणी साचत असल्याने, तेथे तात्काळ ड्रेनेज लाईन टाकून, हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या. वाघोलीतील अनेक रस्ते, ड्रेनेजसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर असून देखील, स्थानिक व प्रशासकीय वादामुळे येथील रस्त्याचा व ड्रेनेजचा प्रश्न सुटू शकला नाही. यावर प्राधान्याने तोडगा काढण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.