लोणी काळभोर (Loni Kalbhor) : ऐन नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खड्डे रविवारी बुजवून आदर पुनावाला फाउंडेशनने नागरिकांना चांगला दिलासा दिला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येथील खड्ड्यांना पुनावालांच्या डोसची मात्रा कामाला येत आहे.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती या गावांच्या हद्दीत येणारा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, सेवा रस्ता व अंतर्गत मार्गावरील रस्त्यांना वारंवार खड्ड्डे पडलेले असतात. तसेच कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा ते थेऊर या मार्गावर देखील वाहतूक मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे या रस्त्यावरही खड्डे पडून रस्ता खराब होत आहे. या रस्त्याची काळजी आदर पुनावाला फाउंडेशन नेहमीच घेत असते. या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी त्यांची एक गाडी आहे. या फाउंडेशनमधील कामगारांनी रविवारी सुट्टी असून देखील एमआयटी कॉर्नर, लोणी काळभोर, थेऊर फाटा व थेऊर येथील रस्त्यातील खड्डे बुजवत रस्ता चकाचक करून नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
या मार्गावरील कचरा उचलण्यासाठी आदर पुनावाला स्वच्छ शहर मोहिमेच्या ६ कचरा गाड्या आहेत. कचऱ्याच्या गाड्या दररोज कचरा उचलून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावतात. त्यामुळे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व थेऊर ग्रामपंचायतींना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या परिसरातील दुर्गंधी व रस्त्याची डागडुजी नेहमी होत असते. यामुळे परिसरात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आदर पूनावालाच्या या सेवांमुळे नागरिक त्यांच्यावर खुश आहेत.
दरम्यान, आदर पुनावाला स्वच्छ शहर मोहिम हा सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि आदर पूनावाला यांचा सामाजिक जबाबदारीतून भारतातील शहरांना अधिक राहण्यायोग्य करण्यासाठी हाती घेतलेला शाश्वत उपक्रम आहे. सेंद्रिय अन्न कचऱ्याचे वैज्ञानिक आणि प्रभावी पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे. कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणावरच जर कचऱ्याचे वर्गीकरण करत त्यातून सेंद्रिय आणि असेंद्रिय कचरा वेगळा केला तर कमीत कमी जागेत त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे शक्य होते. तसेच हे फाउंडेशन त्यांची स्वतःची यंत्रणा वापरून सीएसआरच्या माध्यमातून खड्डे बुजवतात.
नव्याने विकसित होत असणाऱ्या व शहरीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या कदमवाकवस्ती गावामध्ये आदर पूनावाला ग्रुपचे मोठे योगदान आहे. आदर पूनावाला ग्रुपने पाणी , स्वच्छता व रस्ता दुरुस्ती या विषयांच्या समस्या सेवाभाव ठेवून सुव्यवस्थित हाताळल्या आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. तसेच त्यांचा अधिकारी व कर्मचारी वर्ग खुप सेवाभावाने काम करीत असतात. त्यामुळे आदर पुनावाला ग्रुपचे मी मनापासून आभार मानतो व पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
विशाल वेदपाठक (सामाजिक कार्यकर्ते -कदमवाकवस्ती)