– योगेश शेंडगे
शिक्रापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव म्हाळुंगी येथील मंथन आणि अभीरूप परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बबनराव रणदिवे, प्रा. शरद रणदिवे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव म्हाळुंगी गेले सहा वर्षात सर्व ग्रामस्थ व शिक्षक यांच्या समन्वयातून झालेला कायापालट, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून मार्गक्रमण करत आहे.
कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट बक्षीस म्हणून देण्यात आले. शाळेची सुसज्ज इमारत, प्रशस्त क्रीडांगण, वृक्षलागवड, भोजनकक्ष, फिल्टरपाणी, अद्ययावत शौचालय या सर्व सुविधा पाहून खूप समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. तसेच यापुढील काळात शाळेस काही मदत लागल्यास संपर्क करा, असे आश्वासन रणदिवे यांनी दिले.
दरम्यान अध्यक्षीय भाषणात सरपंच बापूसाहेब काळे यांनी शिकविणे आणि घडविणे यातील फरक सांगून शिक्षकांचे कौतुक केले. तसेच निमगाव म्हाळुंगीतील विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होऊन गेल्या अनेक वर्षांपासून शाळेतील विद्यार्थी यांचे गुणगौरव करणे असे समाजउपयोगी असणारी विविध कामे करून रणदिवे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली. याबद्दल या रणदिवे परिवाराचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी गहिनाजी चौधरी, दादासाहेब रणसिंग, ॲड.गणेश शिर्के, वामन गव्हाणे, प्रविण रणसिंग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव भोरडे आणि रणदिवे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व नियोजन मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे, मारुती निकम, अविनाश चव्हाण, संभाजी नरवडे, प्रविण पांडे, सोमनाथ पवार, अंजुम इनामदार यांनी केले.