लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नदीपात्रात कचरा टाकण्यात येत होता. त्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नदीपात्रातच कचरा जाळला जात असे. मात्र, आता असे केल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे उपप्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी सांगितले. याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ने अनेक बातम्या देऊन पाठपुरावा केला होता. आता त्याला यश येताना दिसत आहे.
पूर्व हवेलीतील मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, कोरेगाव मूळ व उरुळी कांचन ग्रामपंचायतींकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अथवा कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी कोणतीही यंत्रणा व स्वतंत्र कचरा डेपोही नाही. त्यामुळे मांजरी ते उरुळी कांचन दरम्यान दररोज शेकडो कचऱ्याचे ट्रक व टेम्पो मुळा मुठा नदीपात्रात राजरोसपणे टाकले जात आहेत. या आशयाची बातमी ‘पुणे प्राईम न्यूज’ने वेळोवेळी प्रकाशित करून याबाबत प्रशासनापुढे वस्तुस्थिती मांडली होती.
अखेर प्रशासनाने ‘पुणे प्राईम न्यूज’च्या बातम्यांची दखल घेत नुकतीच आपल्या पथकासह पूर्व हवेलीतील नदीपात्राच्या ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून आदेश आल्यानंतर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.
मुळा-मुठा नदी पूर्व हवेलीत वाहतीये गटारगंगा म्हणून…
पूर्व हवेलीत नदीकिनारी असणाऱ्या बहुतांशी ग्रामपंचायतींनी मुळा-मुठेला आपल्या हक्काचा कचरा डेपो बनवल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदी पूर्व हवेलीत गटारगंगा म्हणून वाहत आहे. परिणामी, नदीतील जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आला असून, अनेक जलचराच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर, नदीपात्रालगत असलेल्या पाणी पुरवठा संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लाखो एकर शेतातील पिकांवर भयावह परिणाम दिसून येत असल्याने शेतकरी वेगळ्याच विवंचनेत अडकला आहे.
पूर्व हवेलीत कारवाई कधी होणार?
पिंपरी शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. या तीनही नदीपात्रात राडारोडा व मातीचा भराव टाकून सपाटीकरण केले जात होते. या प्रकारची माहिती होताच महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने राडारोडा टाकणारे सहा ट्रक व टेम्पो जप्त केले आहेत. तसेच त्यांच्याकडून 65 हजारांचा दंड वसूल केला आहे. तर पूर्व हवेलीत तर दररोज शेकडो ट्रक व टेम्पो भरून कचरा मुळामुठा नदी पत्रात टाकून नदीचे विद्रुपीकरण केले आहे. त्यांच्यावर कारवाई कधी होणार? याकडे पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांसह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.