पुणे : पुणेकरांना वाहतुकीच्या नियमांबद्दल शिस्त लावण्यासाठी आता पुणे पोलिसांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. पुण्यात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करणार आहेत. पुणे शहरात आता दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येणार असून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी 27 ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
पुण्यात वाहन चालवणा-या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे 3 वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. नाकाबंदीसाठी शहराबरोबरच उपनगरातील 27 ठिकाणे पोलिसांकडून निश्चित करण्यात आली आहेत. या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह 125 पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. बेशिस्त वाहनाचालकांना शिस्त लावण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे असे पोलिसांनी सांगितलं आहे.
याबरोबरच मद्यपी वाहनचालकांची तपासणी ब्रेथ ॲनलायझर यंत्राद्वारे केली जाणार आहे. या यंत्राला लावण्यात आलेली नळी संशयित वाहनचालकाची तपासणी केल्यानंतर बदलली जाणार आहे. वापरलेली नळी नष्ट केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून स्वच्छतेबाबत केल्या जाणाऱ्या तक्रारींना आता वाव राहणार नाही, तसेच संसर्गाची शक्यता राहणार नाही.
दरम्यान, यापूर्वीच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकाचे वाहन जप्त केले जाणार आहे,’ असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.