लोणी काळभोर : गेल्या वर्षी मुंबईसह पुण्यात अनधिकृत होर्डिंग कोसळून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच पुणे महानगरपालिकेसह पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत अनधिकृत होर्डिंग मोठ्या संख्येने आहेत. या अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) येथे सोमवारी (ता.९) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात राजेंद्र पेट्रोल पंपासमोर पीएमआरडीए चे पथक सोमवारी पोहचले. पथकाने महालक्ष्मी ट्रेडर्सच्या समोर असलेले अनधिकृत होर्डिंग जमिनोदोस्त केला आहे. यावेळी पीएमआरडीएचे अधिकारी, पदाधिकारी, अग्निशामक दलाचे जवान व पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. ही कारवाई पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे, गणेश जाधव, विष्णू आव्हाड, पोलीस अंमलदार संभाजी खराद, महिला पोलीस दिपाली मेटकरी, अग्निशामक दलाचे 3 जवान व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर, 15 नंबर, मांजरी, शेवाळेवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊरफाटा, कुंजीरवाडी, नायगाव फाटा, सोरतापवाडी व उरुळी कांचन येथील एललाईट चौक व तळवडी चौकात 200 हून अधिक अनधिकृत होर्डिंग आहेत. हे सर्व होर्डिंग लोकवस्तीत असून जागा मालक व चालकाने धोकादायकरीत्या उभारले आहेत. तर बोरीऐंदी ते पाटस या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला तुरळक अनधिकृत होर्डिंग आहेत. या अनधिकृत होर्डिंगला अनेक ग्रामपंचायतींना होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्याचे, तसेच ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नसतानाही ग्रामपंचायतींनी परस्पर होर्डिंग उभारण्यासाठी जागा मालकांना परवानगी दिल्याचे उघडकीस आले आहे.
पूर्व हवेलीतील होर्डिंग च्या खाली अनेक टपऱ्या, दुकाने, हॉटेल, हातगाड्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचाविल्याचे समोर आले. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगचा जागा मालक व चालकाचे फावले आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी व वाहनचालक यांच्या जीवाला अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनधिकृत होर्डिंगवरील फ्लेक्स काढले आहेत. मात्र काही ठिकाणी लोखंडाचा सांगाडा तसाच धोकादायकरीत्या लटकलेल्या अवस्थेत ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पीएमआरडीएने अनधिकृत होर्डिंग पडण्याचे काम एका कंपनीला दिले आहे. ही कंपनी अनधिकृत होर्डिंग पाडत आहे. अनधिकृत होर्डिंग पडल्यानंतर सर्व लोखंड व साहित्य गोळा करून घेऊन जात आहे. व येणाऱ्या रकमेतून ३५ टक्के रक्कम प्रशासनाकडे जमा करीत आहेत. यामुळे कोणताही पैसा खर्च न करता यामध्ये सुद्धा प्रशासनाचा आर्थिक फायदा होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर-कवडीपाट टोलनाका ते पाटस पर्यंत असलेल्या सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग मालक व चालकांनी आपले होर्डिंग काढून घ्यावे. प्रशासनाकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी परवानगी काढून घ्यावी. अन्यथा प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे.
दीप्ती सूर्यवंशी (उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए)