पुणे : नो पार्कीगमध्ये लावलेल्या त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीला लावलेले जॅमर काढण्यासाठी गाडीमालकाकडे १ हजार रुपयाची लाच मागणी केल्याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागातील सहायक पोलीस फौजदारासह ट्राफीक वॉर्डन यांच्यावर एसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. अनिस कासम आगा,( वय ४८ वर्ष, ट्राफीक वॉर्डन, समर्थ वाहतुक विभाग, रा. कोंढगा, पुणे, खाजगी इसम), किरण दत्तात्रय रोटे, (वय ५१ वर्ष, पद सहायक पोलीस फौजदार, समर्थ वाहतुक विभाग, पुणे शहर-वर्ग-३) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की नो पार्कीगमध्ये लावलेल्या त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीला लावलेले जॅमर काढण्यासाठी आरोपी खाजगी इसम अनिस आगा (ट्राफीक वॉर्डन ) यांनी तक्रारदार(वय ३७ वर्ष) यांच्याकडे १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी एसीबी पुणे येथे केली होती. सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, आरोपी अनिश आगा (ट्राफीक वॉर्डन) यांनी तक्रारदार यांच्याकडे १ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ७०० रुपये स्विकारण्याचे मान्य केल्याचे सिद्ध झाले.
तसेच आरोपी अनिस आगा (ट्राफीक वॉर्डन) कार्यालयात उपस्थित नसताना लोकसेवक सहायक पोलीस फौजदार किरण रोटे यांनी “अनिस आगा यांनी मागितलेले पैसे माझ्याकडे दे,” असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शवून अपप्रेरणा दिल्याचे निष्पन्न झाल्याने दि. ५ नोव्हेंबर रोजी लोकसेवक सहा. पो. फौज, किरण रोटे व खाजगी इसम (ट्राफीक वॉर्डन) अनिस आगा यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे वरील प्रमाणे लाच मागणी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पूणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.