पुणे: नदीपात्र, नाल्यामध्ये तसेच, रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत राडारोडा टाकणाऱ्यावर कारवाई न केल्यास आता पालिका अधिकारी आणि कामगारांवरच शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे मनपा घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी परिपत्रकाव्दवारे क्षेत्रीय कार्यालयास कळवले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्याच्या विकास कामांमधून तयार होणारा राडारोडा, माती, दगड-विटांचे तुकडे, अन्य कचरा इत्यादी नदीपात्र, ओडे नाले, रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पाण्याला अडथळा होऊन पूर परिस्थिती निर्माण होते. शहरातील राडारोडा उचलण्याबाबत व राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वी वेळोवेळी आदेश सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या असतानाही बहुतांशी ठिकाणी राडारोडा टाकण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. यामुळे नदीपात्रात, नाल्यामध्ये, रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत इत्यादी ठिकाणी राडारोडा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहन ताब्यात घेऊन सन २०१७ च्या उपविधी, कलम ५२, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व पर्यावरण कायद्यान्वये दंड वसूल करून राडारोडा टाकण्यास जबाबदार असलेल्या संबंधितांचे मिळकतीवरील बांधकाम परवानगी रद्द करण्यात येणार आहे.
गुन्हा नोंद करण्यासाठी त्या विभागात नियुक्त बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व महापालिका सहायक आयुक्त कार्यालयांकडील महापालिका सहायक आयुक्त, बांधकाम निरीक्षक, विभागीय सॅनिटरी इन्स्पेक्टर, सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्या संयुक्त गस्ती पथक संबंधित उपायुक्त (परिमंडळ) यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. याबाबत कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचे आढळून न आल्यास संबंधित उप आयुक्त (परिमंडळ), महापालिका सहायक आयुक्त, बांधकाम निरीक्षक, विभागीय सॅनिटरी इन्स्पेक्टर, सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना जबाबदार धरण्यात येवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. पालिका घनकचरा विभागाकडून याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.