गणेश सुळ
दौंड : कानगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत भिमा नदीच्या पात्रात बेकायदेशीररित्या वाळू उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाने मंगळवारी (दि.12) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली. दौंड महसूल विभागाने केलेल्या या कारवाईत 11 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली असून, वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
संदीप संभाजी फराटे (रा. दौड, जि. पुणे) व सुयेश धनसिंग भोईटे (रा. सांगवी दुमाळा ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या वाळू माफियांची नावे आहेत. तर शंकर आप्पासाहेब दिवेकर (वय ४७, रा. पाटस, ता. दौड जि.पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर दिवेकर हे तलाठी असून, ते कानगाव, हातवळण येथे नेमणुकीस आहे. दिवेकर यांना मंगळवारी (ता. 12) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांचा फोन आला. तेव्हा शेलार यांनी जिल्हास्तरीय गौण खनिज पथकाच्या प्रमुख ज्योती देवरे यांनी फोनवर सांगितले की, ‘मौजे कानगाव गावच्या हद्दीतील दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या भिमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरु आहे. आम्ही येतोय तुम्ही ताबडतोब या’.
त्यानंतर अरुण शेलार, तलाठी भाऊसाहेब वेताळ, दीपक अजबे व दिवेकर हे त्या ठिकाणी गेले असता, तेथे ज्योती देवरे त्यांचे सहकारी व यवत पोलीस घटनास्थळी दाखल होते. महसूल विभागाच्या पथकांनी भिमा नदीच्या पात्रात छापा टाकला असता, या ठिकाणी एक ट्रक व पाच ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या तसेच भिमा नदीपात्रामध्ये बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या दोन सेक्शन बोटी आढळून आल्या.
मशिन्स सोडून वाळू माफिया पसार
अचानकपणे दाखल झालेल्या पथकामुळे वाळू माफियांची पळापळ झाली व मशिन सोडून पळून गेले. या कारवाईत एक ट्रक, पाच ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या व वाळू असा एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागाचे नागरिकांकडून होतंय कौतुक
महसूल विभागाने केलेल्या या कारवाईबाबत दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली. तर कोणत्याही दबावाला बळी न पडता मोठी कारवाई केल्याने महसूल विभागाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.