राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी हातभट्टींवर छापा टाकण्याचे सत्र सध्या सुरू आहे. मंगळवारी (ता. २७) चोभेमळा येथे कारवाई केल्यानंतर बुधवारी (ता. २८) पुन्हा यवत पोलिसांनी गावठी हातभट्टी बनवत असलेल्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
यवत गावच्या हद्दीतील भुलेश्वर पायथा (यादववस्ती) येथे माधुरी अविनाश गुडदावत या महिला विषारी गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भुलेश्वर पायथ्याशी असलेल्या हातभट्टीवर छापा टाकला असता, त्याठिकाणी गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे २५०० लिटर कच्चे रसायन यासह ७० लिटर तयार दारू असा एकूण ६३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच गोडदावत पळून गेल्या.
आरोपींविरूद्ध यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस हवालदार निलेश कदम, महेद्र चांदणे, रामदास जगताप, एस.डी. शिंदे यांच्या पथकाने केली.