पुणे : हवेली पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड पश्चिम हवेली भागातील सराईत गुन्हेगारांसह दोनशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील या भागातील मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावर डोणजे चोक, खानापूर, आंबी, खडकवासला धरण माथा आदी ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात येणार आहेत.
तसेच रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी निवडणुका शांतेत पार पाडण्यासाठी सशसा दंगा काबू पथके तैनात केली आहेत. खडकवासला, डोणजे, नांदेड, किरकटवाडी या मोठ्या गावांसह खानापूर, आंबी आदी गावांसह सिंहगड, पानशेत रस्त्यावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे गावोगाव पथसंचलन करण्यात आले आहे.
हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या तसेच इतर अवैध कृत्यांत सहभागी असलेल्या दोनशे जणांवर आत्तापर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.