पुणे : लोणी काळभोरमध्ये सेवा दिलेल्या आणि सध्या मुंबईमध्ये नेमणुकीस असलेल्या एका सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मुलाच्या ‘वसुंधरा ज्वेलर्स’मध्ये इन्कम टॅक्स विभागाची धाड पडणार असल्याची बतावणी करीत व्यवस्थापकानेच दुकानातील पाच किलो सोने, ५० किलो चांदी आणि रोकड असा एकूण २ कोटी २७ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. परंतु, पुणे प्राईम न्यूजला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा ऐवज कित्येक कोटींच्या घरात आहे. दुकानाच्या मॅनेजरनेच हा डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १२ मार्च २०२२ ते ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भादवि ४०८, ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद रमेश कुलकर्णी (वय ३५, रा. व्यंकटेश जॉयनेस्ट, लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. या प्रकरणी ज्योतीरादित्य ऊर्फ यश राजेंद्र मोकाशी (वय २२, रा. ललिता महाल, बाणेर रोड, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे वडील राजेंद्र मोकाशी हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश यांच्या कुटुंबियांनी १२ मार्च २०२२ रोजी हडपसर येथील माळवाडी रस्त्यावरील शिवनेरी इमारतीमध्ये ‘वसुंधरा ज्वेलर्स’ नावाने सोन्या-चांदीच्या दाग-दागिन्यांचे दुकान सुरू केले होते. या दुकानात तेव्हापासून आरोपी विनोद कुलकर्णी हा मॅनेजर म्हणून काम करीत होता. जेव्हा दुकान सुरू केले, त्यावेळी या दुकानात ५ किलो सोने, ८५ किलो चांदी भांडवल स्वरूपात फिर्यादी आणि त्यांच्या आई-वडिलांनी नातेवाईक तसेच काही मित्रांकडून घेतले होते. हे भांडवल पुर्णपणे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी याच्याकडे देण्यात आले होते.
दरम्यान, फिर्यादी यश मोकाशी यांनी व्यवसायाकडे लक्ष देण्यास सुरूवात केल्यानंतर व्यवहारांची माहिती आरोपी विनोद व दुकानातील कर्मचाऱ्यांकडून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी व कुटुंबीयांनी लावलेल्या भांडवलापैकी पावणेतीन किलो सोने व ५० किलो चांदी कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याविषयी फिर्यादी यांच्या वडिलांनी व्यवस्थापक विनोद याच्याकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने ७ फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादीच्या वडिलांची भेट घेतली आणि उद्याच सर्व सोने परत करून हिशोब पूर्ण करून देतो अशी बतावणी केली. त्यानंतर, ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान आरोपीने दुकानातील कामगारांना फोन करून इन्कम टॅक्स विभागाची धाड पडणार आहे. मालकाला मला हिशोब द्यायचा आहे.’ असे सांगितले. दुकानात एक माणूस पाठवत असून त्यांच्याकडे दुकानातील सोने चांदी देण्यास त्याने सांगितले. इन्कम टॅक्स विभागाची धाड पडणार असल्याचे खोटे सांगत चोरीच्या उद्देशाने घेऊन सर्व ऐवज लंपास केला.