पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तलयात सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे अशोक धुमाळ यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी इमारतीवरून खाली पडल्याने त्यांना भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची सोमवारी (२९ जानेवारी) प्रकृती अस्थिर झाल्याने दुपारी उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. यावेळी प्रकृती नाजूक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
त्यानंतर अशोक धुमाळ यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद देण्याचे बंद केले होते. सोमवारी रात्री ९ ते ९.३० दरम्यान त्यांचे निधन झाले. सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या निधनाची बातमी समजताच पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. धुमाळ यांच्या पाठीमागे पत्नी, एका मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.