पुणे : गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा… या ओळी पुणे पोलीस दलातील पोलिसांनी सार्थ ठरवल्या आहेत. अपहरण झालेल्या केवळ आठ वर्षांच्या शाळकरी मुलीची सुखरूप सुटका करण्यात पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांना यश आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सिंहगड एक्सप्रेसमधून एक तरुण शाळकरी मुलीला घेऊन निघाला होता. केवळ आठ वर्षांची ही मुलगी शाळेच्या गणवेशात होती. त्याचदरम्यान, पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे त्याच रेल्वेतून प्रवास करत होते. संबंधित तरुणाच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या चाणाक्ष नजरेने अचूक हेरल्या. ननावरे यांनी त्वरित चौकशी सुरू केली. तेव्हा शाळकरी मुलीचे तरुणाने अपहरण झाल्याची माहिती त्यांना मिळाली. प्रसंगावधान राखत तातडीने हालचाली करून ननावरे यांनी तरुणाला पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आणि घाबरलेल्या चिमुरडीची सुखरुप सुटका केली.
न्यायालयीन कामकाजासाठी सहायक निरीक्षक ननावरे मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यांची उच्च न्यायालयात एका प्रकरणात साक्ष होती. सिंहगड एक्सप्रेसने गुरुवारी (ता. ८) ते पुण्याकडे निघाले होते. ३० वर्षांचा एक तरूण आठ वर्षांच्या शाळकरी मुलीला घेऊन डब्यात शिरला. तरुण तिच्याशी हिंदीमध्ये संवाद साधत होता, तर मुलगी मराठीत बोलत होती. ननावरे यांना तरुणाच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. साध्या वेशात असल्यामुळे तरुणाला संशय आला नाही. ननावरे यांनी तरुणाशी गप्पा मारण्याच्या ओघात माहिती घेतली. सुरवातीला त्याने मुलीचा भाऊ असल्याचे सांगितले. प्रवासादरम्यान त्यांनी मुलीची चौकशी केली असता ती मूळची वसईची असल्याचे कळले. तसेच घरात कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्याचे तिने सांगितले. त्याचवेळी आरोपी तरुणाने मुलीला डोळ्याने खुणावत, माहिती सांगू नके असे संगितले.
दरम्यान, ननावरे यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन तिच्या मामाचा मोबाइल क्रमांक मिळवला. ननावरे यांनी मोबाइलवरुन मुलीचे छायाचित्र काढले आणि मामाला पाठविले. ननावरे यांनी त्वरीत पुणे पोलिसांचा नियंत्रण कक्ष आणि लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. शिवाजीनगर रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलिसांचे पथक पोहोचले. ननावरे यांनी तरुणाला पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.
चौकशीत त्या तरुणाचे नाव दयानंदकुमार शर्मा (सध्या रा. वसई, मूळ रा. बिहार) असल्याचे समजले. शर्माविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत मुलीचा मामा पुण्यात राहायला असून, आरोपी शर्माने मुलीला मामाकडे नेतो, असे सांगून तिचे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे.