पुणे : नवी सांगवी परिसरात दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक झालेल्या एका आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.आर. शेट्टी यांनी अटी व शर्तींसह जामीन मंजूर केल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी दिली. आदित्य विश्वंभर सूर्यवंशी (रा. मातापिता निवास, वैदवस्ती, सृष्टी चौक, पिंपळे गुरव, पुणे) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट 2025 रोजी फिर्यादी व त्याचा मित्र ईश्वर शिंदे हे गणपती सनानिमित्त वर्गणी मागत होते. सांगवी येथील सैराट बिर्याणी समोर फिर्यादी थांबले असता आरोपी प्रणव रोकडे, विनोद तलवारे, रिहान शेख, असित धीवर आणि त्यांचे इतर साथीदार यांनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ, लाथाबुक्यांनी मारहाण आणि कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती.
फिर्यादी व त्याचा मित्र ओरडत असताना सर्व लोक जमा झाले त्यावेळी आरोपींनी त्यांच्या कडील कोयते हवेत फिरवून “आम्ही येथील भाई असून जर कोणी आमच्या नादाला लागले तर त्यांना देखील असेच मारू” असे बोलून दुचाकीवर कोयते मारून दहशत निर्माण करून गेले. त्यानंतर फिर्यादी आणि त्याचा मित्राला हॉस्पिटल ला उपचारकामी घेऊन गेले. नंतर फिर्यादी याने वरील सर्व आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन ला कायदेशीर तक्रार दिली होती. या घटनेनंतर फिर्यादीने सांगवी पोलिस ठाण्यात आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, या गुन्ह्यात जामीन मिळण्याकामी आरोपीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली. त्याचप्रमाणे सरकारी वकील यांनी जामीन मिळू नये म्हणून बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला आणि सर्व बाजूंचा विचार करता न्यायालयाने अर्जदार आरोपीचा अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲड. मयूर चौधरी, ॲड. स्वप्नील दाभाडे, ॲड. अफरोज जहागीरदार, ऋषिकेश पाटील, उमर शेख यांनी सहकार्य केले.







