पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ४ पिस्टल, ८ काडतुसे आणि कोयता असा १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धायरी परिसरातील डिएसके स्कुल कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पार्किंग मध्ये करण्यात आली आहे.
वैभव राऊत (रा. पुणे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी धायरी येथील डीएसके स्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या पार्किंगमध्ये काही तरुण अंधारात थांबले आहेत. त्यांच्याकडे पिस्टल व कोयता असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचून तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेतले.
तर त्यांचे इतर तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे हत्यारे आढळून आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता स्मार्ट पॉईंट मॉल येथे दरोडा टाकणार असल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.