लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मित्रासोबत जात असताना, किओ मोपेड मधील पेट्रोल संपल्याने गाडी ढकलत चाललेल्या तरुणाला अडवून अट्टल गुन्हेगार राज पवार व त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी व कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली ग्रामपंचायत हद्दीतील मनाली रिसॉर्टजवळ शुक्रवारी (ता.2) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपींना याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज रवींद्र पवार (वय 25, दोघेही रा.कवडी पाट टोलनाका, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) व जगदीश सोमनाथ घाडगे (वय-24, मोरे वस्ती, काळूबाई मंदिराजवळ फुरसुंगी, ता. हवेली) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संकेत संतोष कदम (वय 21, रा. लेन नं. 06 अष्टविनायक कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत कदम हे एक नोकरदार असून ते त्यांचे मित्र शैलेश जगताप (रा. गंगानगर पुणे) यांच्यासोबत किओ मोपेड गाडीमधून चालले होते. दरम्यान, गाडीमधील पेट्रोल संपल्याने गाडी ढकलत पेट्रोलपंपकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यावरच पाच ते सहा इसम मोटार सायकली जवळ घोळका करून थांबले होते.
दरम्यान, फिर्यादी संकेत कदम व त्याचा मित्र आरोपींकडे दुर्लक्ष करून पुढे चालले होते. तेव्हा आरोपींमधील एकजण म्हणाला. भाई येथे थांबला आहे, दिसत नाही का तुला, भाईला सलाम न करता पुढे चालला का? असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ करु लागला. त्यावेळी फिर्यादी संकेत कदम यांनी ओळखत नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर आरोपींनी ओळख करुन देऊ असे म्हणून त्यांच्याकडील मोटार सायकल मधून लोखंडी हत्यार बाहेर काढले. तेव्हा फिर्यादी व त्यांचा मित्र घाबरुन विरुद्ध दिशेने पळू लागले.
आरोपींनी मनाली रिसॉर्ट जवळील चारचाकी ई व्ही चार्जीग स्टेशन येथे फिर्यादी संकेत कदम यांना पकडले. त्यानंतर कदम यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींपैकी एका इसमाने त्याच्या हातामधील लोखंडी हत्याराने कदम यांच्या डोक्याच्या डाव्या बाजुस मारले. या मारहाणीत फिर्यादी संकेत कदम यांच्या कानाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर आरोपी त्यांच्या हातातील लोखंडी हत्यारे हवेत ऊंचावून कोणी मध्ये आला तर कापुनच टाकतो असे ओरडून परिसरात दहशत निर्माण करून पळून गेले.
याप्रकरणी संकेत कदम यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 5 ते 6 जणांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत राज पवार व जगदीश घाडगे याला बेड्या ठोकल्या आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडीमध्ये रिमांड दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.