पुणे: मुलीच्या लग्नासाठी दिलेली रक्कम वारंवार मागितल्याने मानलेल्या भावाने बहिणीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी मामाला आजन्म कारावास व 10 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर यापैकी 9 लाख रुपये DLSR डिस्टिक लिगल सव्हिस अथाॅरिटी मयताचा मुलगा प्रज्वल व मुलगी लावण्या याना DLSR नियमाप्रमाणे देण्याबाबतचा हुकुम केला आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिले आहेत. हि घटना 13 एप्रिल 2019 रोजी संध्याकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
रविंद्र श्रीनिवास जालगी (वय – 48 रा. कर्वेनगर, पुणे) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कस्तुरी शेखर माने (वय- 45, रा. शिवपार्वती बंगला, सी मंदिराजवळ, साईनगर, हिंगणे (खु) पुणे, मूळ रा. हुबळी, कर्नाटक, असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा प्रज्वल शेखर माने (वय – 19) याने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील ठिकाणी मुलगा प्रज्वल, मुलगी लावण्या, त्यांची आई कस्तुरी असे मागील 15 वर्षापासून वडिलांपासून विभक्त राहतात. मागील 15-16 वर्षापासून मानलेले मामा रविंद्र जालगी हे घरी नियमितपणे येत जात होते. फिर्यादी यांची आई कस्तुरी मागील 10-12 वर्षापासून थोडे-थोडे करून 14 -15 लाख रूपये बहिण लावण्या हीचे लग्न कार्यास मिळतील या उद्देशाने मामाकडे दिले होते.
लावण्या हिचा विवाह असल्याने लग्नाच्या खर्चाकरिता आई कस्तूरी हीने, मामा रविंद्र याचेकडे ठेवण्यास दिलेले पैसे परत मागितले. परंतु मामा रविंद्र हे पैसे देण्यास टाळाटाळ करित होते. त्या कारणावरुन रविंद्र हे कस्तुरी यांना धमकावत होते. त्या कारणावरुन आई व मामा यांच्यामध्ये पैश्यावरून वांरवार भांडणे सुरू होती.
13 एप्रिल 2019 रोजी संध्याकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची आई कस्तुरी घरातील हॉलमधील बेडवर निपचीत पडली होती. आईचे कमरेपर्यंत शरिर बेडवर व दोन्ही पाय जमीनीलगत असल्याचे दिसले. आईच्या गळ्याभोवती लालसर रंगाचा व्रण असल्याचे दिसले व ती मयत झाल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलीसांकरवी आईची मयत बॉडी ससुन हॉस्पीटल, पुणे याठिकाणी नेण्यात आली.
त्याठिकाणी डॉक्टरांनी आईस तपासले असता, ती मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले होते. याप्रकरणी प्रज्वल माने यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधायक कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी त्वरित अनोळखी इसमाची ओळख पटवून आरोपी रविंद्र जालगी याला अटक केली होती. अटक केल्यानंतर आरोपीचा खटला शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारच्या वतीने अॅड. नामदेव तरळगटटी यांनी केस लढविली. या खटल्यात सरकारी वकील नामदेव तरळगटटी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रविंद्र जालगी याला आजन्म कारावास व 10 लाख रुपये दंडाची शिक्षा व यापैकी 9 लाख रुपये DLSR डिस्टिक लिगल सव्हिस अथाॅरिटी मयताचा मुलगा प्रज्वल व मुलगी लावण्या याना DLSR नियमाप्रमाणे देण्याबाबतचा हुकुम न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिला आहे.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील अॅ ड. नामदेव तरळगटटी यांना पुणे येथील सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, पोलीस निरीक्षक सतिश वसंतराव उमरे, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहा. पोलीस फौजदार एस. पी. पुणेकर, पोलीस हवालदार दिपक गब्दुल्ले यांची बहुमुल्य मदत झाली.