पुणे : प्रमुख आरोपीने मोबाईलमधील पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड टाकले आणि पहिला फोन केंद्र सरकारच्या एका संस्थेतील कर्मचारी संतोष कुरपेला केला. त्याला सांगितले की, शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माईंडला सांगा, अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी तीन जणांना अटक केली असून त्यांना शनिवारी न्यायालायत हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नितीन अनंता खैरे (वय – ३४, रा. गादी स्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (वय २४) आणि संतोष दामोदर कुरपे (रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. संतोष कुरपे हा ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या केंद्र सरकाराच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट या पदावर आहेत. आतापर्यंत शरद मोहोळ खून प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन वकील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
यावेळी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी या गावात गोळीबाराचा सराव केला होता. यामध्ये आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे सहभागी झाले होते. त्यानंतर खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली. तसेच खुनाच्या कटात या दोघांचा सहभाग आहे. त्यांनीबाकीच्या आरोपींकडून तयारी करून घेतली. यामधील खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची एक मिटिंग झाली होती, त्याला आरोपी आदित्य गोळे उपस्थित होता. शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यादरम्यान खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे गेल्यानंतर हे आरोपी थांबले. त्यावेळी तिथे आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते. त्यावेळी आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आले. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून टाकत नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपे याला केला.
शरद मोहोळचा खून करण्यासाठी ४ पिस्टल आणण्यात आले होते. त्यातील ३ पिस्टल जप्त करण्यात आले असून यातील १ पिस्टल संदर्भातील माहिती खैरे आणि गोळे यांच्याकडे आहे. हडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता, त्यावेळी अजून काही आरोपी उपस्थित होते. मुन्ना पोळेकर आणि इतर आरोपीचा सोबत तपास करायचा असल्याने पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी तांबे यांनी केली होती. त्याला विरोध करत आरोपीच्या वतीने लोक अभिरक्षक कार्यालच्या वतीने मयूर दोडके यांनी बाजू मांडली. यावेळी दोडके यांनी न्यायालयात सांगितले की, संतोष कुरपे यांना अनोळखी क्रमांकावरून एक फोन आल्याने उचलला. पलीकडून शरद मोहोळचा गेम केला असून मास्टर माईंडला सांगा असे सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीना १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.