पुणे : सांगली जिल्ह्यातील वायफळे गावात दोन दिवसांपूर्वी एकाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोन आणि सांगली पोलीसांच्या संयुक्त पथकाने खेड-शिवापूर परिसरातून अटक केली आहे.
विशाल सज्जन फाळके (वय 32, रा. आंबेगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपीला सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सांगलीतील वायफळे गावात पूर्ववैमनस्यातून सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात रोहित फाळके याचा खून झाला. खुनातील मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके हा घटनेनंतर पसार झाला होता. तो पुण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक त्याचा शोध घेत होते. या दरम्यान संशयित आरोपी हा खेड शिवापूर भागात असल्याची माहिती पुणे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावेळी पथकाने सापळा रचून आरोपी विशाल फाळकेला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा यनिनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अशिष कवठेकर, अमोल रसाळ, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, नागनाथ राख यांनी ही कामगिरी केली.