लोणी काळभोर, (पुणे) : ‘नांदायला का येत नाही’ असे म्हणून पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरात २८ जुलै २०१९ मध्ये घडली होती. आता या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी दिले आहेत.
भालचंद्र गिराप्पा सुर्वे (वय ३७, रा. आचेगाव,ता. द. सोलापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अर्चना उर्फ बबली गिराप्पा सुर्वे (वय २९, अशोक नगर, उरुळी देवाची, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बबलीचे वडील दत्ता बाबुराव बागडे (वय ५४, अशोक नगर, उरुळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालचंद्र सुर्वे व अर्चना हे दोघे नात्याने पती-पत्नी होते. त्यांना साहिल आणि श्रावणी आधी दोन मुले आहेत. या दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्यामुळे अर्चना या आई-वडिलांकडे उरुळी देवाची येथे माहेरी राहण्यासाठी आल्या होत्या. रविवारी मुलगी घरी एकटी असताना जावई भालचंद्र सुर्वे हा घरी आला. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरु झाले. यावेळी ‘नांदायला का येत नाही, तुझे कोणासोबत तरी लफडे चालू आहे’ असे म्हणून भालचंद्र सुर्वे याने अर्चनावर चाकूने हल्ला करून खून केला, अशी फिर्याद दत्ता बागडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी भालचंद्र सुर्वे याला अटक केली होती. या गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी भालचंद्र सुर्वे याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास व आर्म अॅक्टनुसार तीन वर्षे साधा कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश बी. पी. क्षीरसागर यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील राजेश कावेडीया यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस हवालदार ललिता कानवडे, पोलीस अंमलदार सोमनाथ गळाकाटे व सर्जेराव धडस यांची मदत मिळाली.