लोणी काळभोर (पुणे) : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सख्ख्या भावाने बहिणीला तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी लक्ष्मण हरीभाऊ काळे ( रा.केसकर वस्ती, लोणीकाळभोर) हा दोषी ठरला होता. त्यामुळे तो तुरुंगवास भोगत होता. मात्र, तीन वर्षाच्या ‘चांगल्या वर्तणुकीच्या हमी पत्रावर’ आरोपीची ‘प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट’ नुसार सुटका करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. ए. आय. पेरमपल्ली यांनी दिले आहेत.
मात्र, आरोपीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रोबेशन ऑफिसर, जिल्हा प्रोबेशन ऑफिसर, पुणे यांच्या देखरेखीखाली राहावे लागेल, तसेच तीन वर्षांसाठी चांगल्या वर्तणुकीचा बंधपत्र सादर करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी संगीता महादू जाधव (धंदा शेत मजूरी, रा. केसकरवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली. जि. पूणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. ही घटना ६ फेब्रुवारी २०१७ रोजी लोणी काळभोर परिसरातील केसकरवस्ती येथे घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती महादू जाधव, मूलगी हे सर्वजण केसकरवस्ती येथे राहण्यास असून शेतमजूरी करून आपली उपजिवीका भागवतात. तसेच फिर्यादी यांचा भाऊ लक्ष्मण काळे हा देखील तेथेच राहत आहे. आरोपी काळे याला दारूचे व्यसन आहे. दरम्यान, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती महादू, भावजय विमल काळे, सुरेखा काळे, भाऊ मारूती काळे हे लोणी काळभोर येथील संतोष गोयल यांच्या वाट्याने केलेल्या शेतातील बटाटे भरण्याचे काम करत होते.
त्यावेळी फिर्यादी यांचा भाऊ लक्ष्मण काळे यांनी त्या ठिकाणी येऊन पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने तूम्हा दोघांना खल्लासच करतो, असे म्हणत तलावारीने फिर्यादी यांच्या डोक्यात वार करत गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपरोक्त नमूद गुन्ह्यातील आरोप हा फिर्यादी यांचा सख्खा भाऊ असून फिर्यादी आणि तिचा दुसरा भाऊ हे फितूर झाले. मात्र, पंच यांची साक्ष व सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी धरले आहे. पैरवी म्हणून जमादार पोलीस हवलदार ललिता कानवडे यांनी काम पाहिले.