पुणे : पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख आणि चंद्रकुमार कनोजिया यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हे आदेश वानवडी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी एस. एच. अटकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणात आरोपीचा सथीदार बाप्या गोसावी ऊर्फ सोमनाथ यादव ऊर्फ सूरज दशरथ गोसावी पसार झाला आहे. त्याला अटक केल्यानंतर तिघा आरोपींची एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्या चौकशीचा अधिकार राखून ठेवून वानवडी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अटकरे यांनी दोघा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला.
सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब शेखने खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पसार झालेला साथीदार बाप्या गोसावीचे नाव खोटे सांगितल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. न्यायालयाने शोएब आणि चंद्रकुमार यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.