गणेश सुळ
केडगाव : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावाजवळ चारचाकी वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात केडगाव येथील प्रसिद्ध व्यापारी, उद्योजक लालासाहेब पंढरीनाथ शेळके (वय-55) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ जवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, केडगाव येथील शेळके हे एका नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी कुरकुंभ येथे गेले होते. लग्न सोहळा उरकून ते आपल्या गावी केडगावला येत होते. त्यावेळी कुरकुभ गावाजवळ आले असता एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रसिद्ध लिंबू व्यापारी म्हणून त्यांची ओळख
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन शेळके यांचे ते वडील होते. जुन्या काळी प्रसिद्ध लिंबू व्यापारी म्हणून परिसरात त्यांची वेगळीच ओळख होती. लिंबू व्यापारी व अडतदार आबा या नावाने त्यांना संबोधायचे. नेहमीच हसतमुख चेहरा व मितभाषी स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. दौंड तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून लालासाहेब शेळके यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.