शिरवळ : शिरवळ येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी 12 जानेवारी रोजी नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे घडली आहे. रुबेल सीन्हा (वय-२४) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. रुबेलच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नामांकित आयटी कंपनीमध्ये कार्यरत तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
दरम्यान, या धडकेत रुबेल ही रस्त्यावर कोसळली. अंगावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शिरवळ येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.