पुणे : पुण्यातील नवले पूल परिसरात शनिवारी भरधाव टँकरने सात ते आठ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. अपघातानंतर मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. या बाह्यवळण मार्गावरून एक टँकर दुपारी चारच्या सुमारास निघाला होता. टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकरने एकापाठोपाठ सात ते आठ वाहनांना धडक दिली. अपघातामध्ये मोटारींचे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजूला काढली. अपघातात कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.